मोजत आहे... व्ह्यूज संजय नगर येथे नव्या अंगणवाडी इमारतीचा भूमिपूजन सोहळा;

संजय नगर येथे नव्या अंगणवाडी इमारतीचा भूमिपूजन सोहळा;

लहान मुलांसाठी सुरक्षित शिक्षणाची नवी पहाट

पालघर, प्रतिनिधी 

पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत संजय नगर येथे मंगळवारी १० डिसेंबर रोजी नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी, सरपंच आनंद धोडी, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून विधिवत भूमिपूजन करण्यात आले.


सध्या संजय नगर आणि सिद्धार्थ नगर येथील अंगणवाड्या भाड्याच्या जीर्ण-धोकादायक इमारतींमध्ये चालत आहेत. या इमारतींच्या छतातून पाणी गळते, भिंतींना तडे गेले असून लहान मुले भीतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत. आता पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नवीन अंगणवाडी इमारतींना मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

सरावली परिसरात सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने अंगणवाडीसाठी जागा मिळणे कठीण झाले होते. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांनी सातत्याने पाठपुरावा करून संजिल्हा परिषदेकडून संजय नगर आणि सिद्धार्थ नगर येथे प्रत्येकी एक गुंठा जागा मंजूर करून घेतली. त्याच प्रयत्नांचे फलित म्हणून आज दोन्ही ठिकाणी नव्या इमारती उभ्या राहणार आहेत.

संजय नगर अंगणवाडी इमारतीसाठी १० लाख ६५ हजार रुपये तर सिद्धार्थ नगरसाठी १० लाख ६८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नव्या इमारती पूर्ण झाल्यानंतर परिसरातील लहान मुलांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

हा सोहळा बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, लवकरच दोन्ही अंगणवाड्या मुलांच्या हसण्याने आणि खेळण्याने गजबजून जातील, असा विश्वास पूर्णिमा धोडी यांनी व्यक्त केला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

Post a Comment

Previous Post Next Post