मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी राष्ट्रीय विज्ञान दिन व पालक मेळावा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय विज्ञान दिन व पालक मेळावा उत्साहात संपन्न

 झरी (ता. पालघर) – ज्ञानमाता आश्रम शाळा, झरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा विज्ञान प्रदर्शन व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देत पालक-शाळा संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमास पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष तथा जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष कृष्णा पावडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतरत्न व नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘रामन इफेक्ट’ या प्रकाश किरणांच्या संशोधनाच्या स्मरणार्थ देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि विज्ञानाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचावे हा या दिनाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.


आजच्या युगात मोबाईल, इंटरनेट व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वाढता वापर लक्षात घेता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार, बँकिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडून आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार सकारात्मक दृष्टीकोनातून करावा, असे आवाहन त्यांनी केले.


शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळेतील ६० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी २६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून त्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापिका सिस्टर बास्तियाना फर्नांडिस यांनी माहिती दिली की, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील ‘A’ श्रेणीत निवड झालेल्या पाच शाळांमध्ये ज्ञानमाता आश्रम शाळेचा समावेश झाला आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान शिक्षक हेमंत अधिकारी, हेमाली भंडारी, थापड सर, सहकारी शिक्षक, मुख्याध्यापिका व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शाळेत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी ३५० विद्यार्थी वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत विविध गुणदर्शन उपक्रम राबविले जातात. क्रीडा क्षेत्रातही शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विभागीय व राज्यस्तरावर पारितोषिके पटकावली आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करून नेतृत्व कौशल्याचे दर्शन घडविले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्या सिस्टर फर्नांडिस यांनी यावेळी केले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने