पालघर : पालघर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या सक्रिय सदस्या श्रीमती निमा रमेश खुर्दे यांची अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गातून नगर पथविक्रेता समितीच्या सदस्या म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
श्रीमती निमा खुर्दे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पथविक्रेत्यांच्या प्रश्नांना समितीमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी एक सक्षम प्रतिनिधित्व मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. पथविक्रेत्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, व्यवसायासाठी उपलब्ध जागा, प्रशासनाशी संबंधित अडचणी तसेच त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका त्या पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित सदस्या श्रीमती निमा रमेश खुर्दे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पथविक्रेत्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहावे, अशी अपेक्षाही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
तसेच, पथविक्रेत्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी राष्ट्रीय पँथर्स आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.
निमा खुर्दे यांच्या निवडीचे पथविक्रेता बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून पथविक्रेत्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
