सफाळे (प्रतिनिधी) : सफाळे परिसरात अनेक वर्षे शैक्षणिक सेवा देणाऱ्या विद्याभवन हायस्कूल, एडवण येथील सन १९८४-८५ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन माकणे येथील गावड सभागृहात उत्साहात पार पडले.
या संमेलनादरम्यान सन १९८४-८५ च्या माजी विद्यार्थिनी सौ. मनिषा कुलकर्णी (सातवे) यांनी दातिवरे येथील शिक्षण संस्थेत तब्बल ३५ वर्षे शिक्षिका म्हणून प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर निवृत्ती स्वीकारल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, दातिवरे शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख ॲड. डॉ. निलेश राऊत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. निलेश राऊत यांनी ‘सखे सोबती’ माजी विद्यार्थी संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. माजी विद्यार्थी संघ गेल्या ७-८ वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असून, परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. तसेच शाळेतील व परिसरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना तसेच महिलांना विविध प्रकारे मदत करण्याचे कार्य संघाच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हे कार्य अत्यंत उदात्त व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही डॉ. राऊत यांनी नमूद केले.
या स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी श्री. योगेश केळवेकर, श्री. धनंजय तरे, श्री. भुवनेश्वर राऊत, श्री. विलास जाधव, लिलेश किनी, संदेश तरे, संदेश पाटील, शुभांगी पाटील, मंगेश आक्ररे, राजेंद्र राऊत, अमृता देशपांडे आणि ललित बाफना यांनी विशेष मेहनत घेतली.
जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे स्नेहसंमेलन माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले.
