मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दलाचा पुढाकार*

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दलाचा पुढाकार*


 

*बोईसर, दि. ३ ऑक्टोबर २०२६ :* महाराष्ट्र शासन, गृह विभाग (विशेष), नागरी संरक्षण दल, तारापूर, जिल्हा पालघर अंतर्गत बोईसर विभागाच्या वतीने चिराग विद्यालय, भीमनगर, बोईसर येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, तारापूर, मा. श्री. काशिनाथ आर. कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय क्षेत्ररक्षक श्री. नरेश अनंत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.


      महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर २०२६ हा सायबर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, बँका, व्यापारी आस्थापना तसेच नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत

.

      नागरी संरक्षण दल, तारापूर, जिल्हा पालघर अंतर्गत बोईसर विभागात दर शनिवारी नागरिक व स्वयंसेवकांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयावर व्याख्यान तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित केले जाते. या साप्ताहिक डिव्हिजनल डेचे औचित्य साधून नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांसाठी सायबर गुन्हे व सायबर सुरक्षेबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


     या कार्यक्रमात एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, बोईसर येथील पोलीस अंमलदार श्री. पंकज महाजन तसेच पोलीस हवालदार श्री. विशाल पाटील यांनी उपस्थित नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याच्या उपाययोजना, संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहणे, वैयक्तिक व बँकिंग माहिती सुरक्षित ठेवणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


      कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप मासरे, पोलीस हवालदार श्री. निलेश पाटील, तारापूर विद्यामंदिर हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. आशा रमेश नितनवरे, रा. ही. सावे हायस्कूल, तारापूर येथील प्राध्यापक श्री. संपत वैराळ तसेच नागरी संरक्षण दलाचे मानसेवी अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



      सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत सजग राहून कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये, तसेच सायबर गुन्ह्यांविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने