मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी दातिवरे, एडवणसह परिसरातील पुरातन देवस्थाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची मागणी

दातिवरे, एडवणसह परिसरातील पुरातन देवस्थाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची मागणी

 ॲड. डॉ. निलेश राऊत यांचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना निवेदन



सफाळे (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या दृष्टीने समृद्ध असून जिल्ह्यातील शेकडो वर्षे जुनी देवस्थाने, मंदिरे व धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी त्यांचा जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. डॉ. निलेश रमेश राऊत यांनी केली आहे.


यासंदर्भात ॲड. डॉ. निलेश राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दातिवरे, एडवण, भवनगडसह परिसरातील विविध गावे, मंदिरे व पुरातन देवालयांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्याची मागणी करणारे निवेदन खासदार डॉ. हेमंत सावरा यांना सादर केले.


यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय पटलावर ठेवण्यात येईल, असे सांगितले.


निवेदनात दातिवरे येथील श्री सतवादेवी मंदिर व श्री राम मंदिर, कोरे येथील हरबादेवी व हनुमान मंदिर, एडवण येथील श्री आशापुरा, श्री महादेव व श्री राम मंदिर, चटाले येथील श्री हनुमान मंदिर, उसरणी येथील शिवमंदिर, अंबोडे येथील बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भवनगड येथील पुरातन शिवमंदिर, वेडी येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व देवी मंदिर, विराथन बुद्रुक येथील 


श्री वाघोबा गावदेव मंदिर, जलसार व सोनावे येथील साईबाबा मंदिरे, शिरगाव येथील सप्तशृंगी मंदिर व दर्गा, माहीम येथील राम मंदिर, श्री महाकाली मंदिर व महिकावती मंदिर, सातपाटी येथील श्री राम मंदिर, नवली येथील पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, पालघर येथील राम मंदिर व आंबा माता मंदिर आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या देवस्थानांना शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विशेष अनुदान मिळाल्यास धार्मिक स्थळांचा विकास होण्यासोबतच परिसरातील पायाभूत सुविधा सुधारतील. तसेच स्थानिक पर्यटनाला चालना मिळून भाविक व पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वसई तालुका प्रमुख प्रथमेश बांदेकर, भाजपा जिल्हा पदाधिकारी भरत काळे, माजी सरपंच कांद्रेभुरे जगदीश पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालाल लोखंडे, वैद्यकीय मदत सफाळे विभाग प्रमुख प्रसाद कुडू आदी उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने