मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी न्यायालयीन लढ्याबरोबरच जनजागृतीची गरज; पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

न्यायालयीन लढ्याबरोबरच जनजागृतीची गरज; पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

 


पालघर : कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या अतिक्रमण, ताबा आणि मालकी हक्काशी संबंधित प्रश्नांवर संविधानिक व न्यायालयीन मार्गाने लढा पुढे नेण्याबरोबरच समाजामध्ये वस्तुनिष्ठ माहिती आणि कायदेशीर बाबींबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 

याच पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा जयस्तंभ बचाव समिती, पालघर जिल्हा व तालुका यांच्या पुढाकाराने रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी पालघर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील समाजमंदिर सभागृहात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.


या अभियानात पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण तसेच पुढील न्यायालयीन रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विजयस्तंभाशी संबंधित हक्क, संरक्षण, ताबा आणि मालकी हक्काच्या प्रश्नांबाबत उपलब्ध कायदेशीर बाबींचा अभ्यास करून न्यायालयीन प्रक्रियेला संविधानिक चौकटीत पुढे नेण्यावर यावेळी चर्चा झाली.


कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयु. दादाभाऊ अंभंग होते, तर अध्यक्षस्थानी मा. किरण हरिभाऊ जाधव होते. यावेळी विविध सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायालयीन प्रक्रियेसोबत जनजागृतीवर भर

कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या प्रश्नावर पुढील काळात न्यायालयीन लढा कोणत्या दिशेने न्यावा, उपलब्ध कायदेशीर कागदपत्रांचा अभ्यास कसा करावा आणि न्यायालयीन निर्णयांची माहिती समाजातील नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवावी, यावर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.



अशा संवेदनशील प्रश्नांमध्ये भावनिक प्रतिक्रियांपेक्षा संविधान, कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीत विषय मांडणे, तसेच संबंधित कागदपत्रे व न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करून त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना कोरेगाव-भीमा विजयस्तंभाशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेची माहिती मिळावी आणि आगामी काळातील सामाजिक व कायदेशीर उपक्रमांना दिशा मिळावी, हा उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.


दरम्यान, कोरेगाव-भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या वतीने पालघर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

— जागरूक आवाज

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने