बोईसर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी बोईसर मंडळात करण्यात आले. या शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, आरोग्य, पुरवठा विभाग, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरात आधारकार्ड दुरुस्तीची ५६ प्रकरणे, भूमी अभिलेख विभागाकडून २११ सनद वाटप, ८५ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १२ प्रलंबित फेरफार नोंदींना मंजुरी देण्यात आली. तसेच सातबारा, आठ-अ व फेरफार वितरणाची ६७३ प्रकरणे हाताळण्यात आली.
भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अंतर्गत जातीचे दाखले मिळण्यासाठी ५९ अर्ज प्राप्त झाले. इतर जातींचे ५१ अर्ज, उत्पन्न दाखल्यांचे ४८ अर्ज, अधिवास दाखल्यांचे ६ अर्ज, ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचे २ अर्ज आणि रहिवास दाखल्याचा १ अर्ज प्राप्त झाला.
पुरवठा विभागाच्या माध्यमातून नाव कमी-जास्त करण्याची ३७ प्रकरणे, नवीन रेशन कार्डचे ६ अर्ज आणि दुय्यम रेशन कार्डचे ७२ अर्ज हाताळण्यात आले. महावितरणच्या सोलर योजनेसाठी २ अर्ज प्राप्त झाले, तर प्रधानमंत्री मोफत वीज योजनेबाबत ६९ नागरिकांना माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायत खैरापाडा अंतर्गत जन्म नोंदणीचे ५, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचे २ दाखले देण्यात आले. ग्रामपंचायत सरावली अंतर्गत जन्म नोंदणीचे १०, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचा १ दाखला देण्यात आला. तसेच मालमत्ता पत्रकाची ४ प्रकरणे हाताळण्यात आली.
या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण १४२२ नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचून शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक प्रकरणांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यास मदत झाली.

