तारापूर औद्योगिक क्षेत्र येथे सुरक्षेच्या दाव्यांना पुन्हा एकदा तडा जात असल्याची घटना समोर आली आहे. प्लॉट क्रमांक E-135 येथे असलेल्या भगरिया इंडस्ट्रीज या कंपनीमधून विषारी वायूची गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेषतः ई-झोन परिसरात या गळतीचा परिणाम जाणवल्याने कामगार व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसची गळती सुरू झाली. काही वेळातच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने अनेक कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही विभागातील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने सुरक्षा यंत्रणा आणि कारखाना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औद्योगिक सुरक्षेचे नियम केवळ कागदावरच राहिले आहेत का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासनाला देण्यात आल्याचे समजते. गॅस गळतीचे नेमके कारण काय, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औद्योगिक प्रगतीसोबत कामगार आणि नागरिकांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.
