पालघर तालुका : प्रतिनिधी
“मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांनी किती प्रगती केली आहे यावरून मोजतो,” असे विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण दापोली गावातील महिला क्रिकेट सामन्याने पुन्हा एकदा जिवंत केली. पालघर तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपात भरविण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेने तालुक्याच्या इतिहासात परिवर्तनाचे नवे पान उघडले आहे.
शहरीकरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पालघर तालुक्यात अजूनही पारंपरिक संस्कारांची छाप स्पष्टपणे दिसून येते. अशा वातावरणात दापोली गावाने महिलांसाठी क्रिकेट सामना आयोजित करून सामाजिक बदलाची ठिणगी पेटवली आहे. वर्षानुवर्षे दडपल्या गेलेल्या स्वप्नांना या सामन्याने मोकळे आकाश दिले.
स्वयंपाकघर, शिक्षण आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या महिलांनी आज मैदानावर बॅट हाती घेतली. कालपर्यंत कीबोर्ड फिरवणारे आणि संसार सांभाळणारे हात आज चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत होते. अवघी १२ वर्षांची मुलगी जेव्हा मैदानात उतरली, तेव्हा तिच्या पावलांखाली केवळ माती नव्हती, तर पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या भीतींचा चुराडा होत होता. दुसऱ्या टोकाला साठी ओलांडलेली ज्येष्ठ महिला आत्मविश्वासाने उभी होती. आयुष्यभर संसाराच्या जबाबदाऱ्यांनी वाकलेली कंबर आज ताठ झाली होती.
हा सामना म्हणजे तीन पिढ्यांचा संगम ठरला—भूतकाळाची वेदना, वर्तमानाची धडपड आणि भविष्याची आशा एका मैदानात एकवटली होती. दापोली गावाने केवळ क्रीडा स्पर्धा आयोजित केली नाही, तर समाजाला थेट प्रश्न विचारला—“स्त्रीला संधी का नाही?” बदल नेहमी मोठ्या शहरांतूनच होतो, ही समजूत या छोट्या गावाने खोटी ठरवली.
सहभागी झालेल्या विविध गावांतील महिला संघांनी घरची कामे आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळत मैदान गाठले. त्यांच्या अंगात क्रीडावेश होता, पण मनात कुटुंबाची काळजीही होती. तरीही त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला. हा वेळ केवळ खेळासाठी नव्हता, तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. समाजाने वर्षानुवर्षे उभ्या केलेल्या मर्यादांच्या भिंतींना आज तडे जाताना दिसले.
या सामन्याने स्पष्ट केले की, संधी दिल्यास स्त्री कधीच मागे राहत नाही. तिला दया नको, संधी हवी; सहानुभूती नको, समानता हवी; मर्यादा नकोत, तर मोकळे आकाश हवे. कारण स्त्री ही केवळ घराचीच नाही, तर समाजाची शिल्पकार आहे.
आज पालघरच्या मैदानावर घडलेली ही घटना केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही. मुलांनी आपल्या आईला खेळताना पाहिले, मुलींनी आपल्या आजीला धावताना पाहिले. या दृश्यांनी समतेची बीजे रोवली आहेत.
दापोली गावातील हा महिला क्रिकेट सामना म्हणजे नव्या पहाटेची चाहूल आहे. ही पहाट कायम राहिली, तर समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल. आणि त्या दिवशी आपण अभिमानाने म्हणू शकू—तालुक्याच्या प्रगतीत प्रत्येक स्त्रीचे पाऊल सर्वांत पुढे असेल.
— प्रदीप शेलार
(या सामन्याचे साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल वेढी गावच्या महिला खेळाडू तसेच आयु. किर्ती शेलार, आयु. किशोर शेलार आणि आयु. महेश शेलार यांचे मनःपूर्वक आभार.)
