मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी माहीम मेन रोडची दयनीय अवस्था; अपघातांना आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कधी संपणार?

माहीम मेन रोडची दयनीय अवस्था; अपघातांना आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कधी संपणार?

माहीम मेन रोडवरील रांजणपाडा ते वळण नाका या संपूर्ण पट्ट्यात रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून हा रस्ता सध्या अपघातांना खुले आमंत्रण देत आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि वाहतुकीचा वाढलेला ताण यामुळे दररोज अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. माहीम आंबेडकर आळी परिसरातील रहिवाशांनी या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधले असतानाही संबंधित बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दुचाकीस्वार, पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांची वाहने यांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने अपघातांचे प्रमाण अधिक वाढत असून अनेक जण जखमी होत आहेत, तर काही वेळा जीवितहानीचाही धोका निर्माण झाला आहे.

“कर भरतो, पण सुविधा कुठे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

एकीकडे ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘विकास’च्या घोषणा दिल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र मूलभूत रस्त्यांची अवस्था अशी दयनीय का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आता तरी बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देणार की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा संतप्त सवाल माहीमकर नागरिक विचारत आहेत.



जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने