मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर: ड्युरियन कंपनीला भीषण आग; ९६ कामगारांचा थोडक्यात बचाव, यंत्रणेतील त्रुटी समोर

पालघर: ड्युरियन कंपनीला भीषण आग; ९६ कामगारांचा थोडक्यात बचाव, यंत्रणेतील त्रुटी समोर

ड्युरियन कंपनीत ९६ कामगारांचा जीव धोक्यात; अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून शर्थीचे प्रयत्न

जागरूक आवाज

पालघर प्रतिनिधी 

पालघर शहरातील बिडको नाका परिसरात असलेल्या प्रसिद्ध 'ड्युरियन' फर्निचर कंपनीला आज दुपारी १:३० च्या सुमारास भीषण आग लागली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या या कंपनीत लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने, या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

९६ कामगारांचा थरारक बचाव

आग लागली तेव्हा कंपनीत एकूण ९६ कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ३३ कायमस्वरूपी, ६० कंत्राटी कामगार आणि ३ सुरक्षारक्षकांचा समावेश होता. आगीचा भडका उडताच सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालघर एमआयडीसी आणि बीएआरसी च्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची भीषणता पाहता वसई-विरार महानगरपालिकेची मदतही मागवण्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

नगरपरिषदेचे मोठे वाहन नादुरुस्त; मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

या दुर्घटनेच्या वेळी नगरपरिषदेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असता, पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की:

"आमच्याकडे अग्निशमन दलाची दोन वाहने आहेत, परंतु त्यापैकी मोठे वाहन तांत्रिक बिघाडामुळे सध्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी आहे. उपलब्ध असलेले दुसरे वाहन आम्ही तातडीने घटनास्थळी रवाना केले आहे."

प्रशांत जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर नगरपरिषद 

प्रशासकीय पाहणी आणि तपास

घटनेची माहिती मिळताच पालघरच्या तहसीलदारांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीत कंपनीचे फर्निचर आणि कच्चा माल जळून खाक झाला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून तपास केला जाणार आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने