मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी समतेच्या लढ्याची प्रेरणा – चवदार तळे सत्याग्रह दिनाची पूर्वसंध्या महाडमध्ये साजरी

समतेच्या लढ्याची प्रेरणा – चवदार तळे सत्याग्रह दिनाची पूर्वसंध्या महाडमध्ये साजरी

 


महाड : भारतीय सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व ठरलेला चवदार तळे सत्याग्रह आजही समतेच्या लढ्याची जाज्वल्य प्रेरणा देतो. या ऐतिहासिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाड येथे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी उभारलेला हा लढा भारतीय समाजव्यवस्थेतील अन्यायाविरुद्धचा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. या सत्याग्रहातून समानता, बंधुता आणि न्याय यांचे विचार दृढपणे समाजासमोर आले.


या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विविध वक्त्यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक योगदानाचा गौरव करत आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी कॉ. एम. ए. बेबी, पोलिट ब्यूरो सदस्य कॉ. अशोक ढवळे व कॉ. मरियम ढवळे, तसेच केंद्रीय कमिटी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. अजित नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


चवदार तळे हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. दरवर्षी येथे मोठ्या श्रद्धेने स्मृती दिन साजरा केला जातो. यंदाही कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्यात आला.

समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने