मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी ४० वर्षांचा अन्याय, आता संयमाचा बांध तुटतोय! सुर्या प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक

४० वर्षांचा अन्याय, आता संयमाचा बांध तुटतोय! सुर्या प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक

 , वणई व साखरे या गावांतील सुर्या प्रकल्प कालव्यामुळे भूसंपादित झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तब्बल ४० वर्षांपासून भाडे व मोबदला मिळालेला नाही, ही गंभीर बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. काल दिनांक ०६/०२/२०२६ रोजी सुर्या प्रकल्प कालवा कार्यकारी अभियंता, मनोर येथे या प्रश्नावर तीव्र चर्चा झाली.


पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना जमीनमालकांची कोणतीही लेखी सहमती न घेता महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेमार्फत संबंधित जमिनी थेट “पाटबंधारे कालवा” या नावाने सातबाऱ्यावर नोंदवल्या. हा प्रकार केवळ नियमबाह्यच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालणारा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.


इतकेच नव्हे, तर आजपर्यंत शेतकऱ्यांना झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीची—ज्यात छोटे कालवे, रस्ते, फळझाडे, फुलझाडे, खैर, बांबू, जांभूळ, साग, धामण आदी सर्व प्रकारच्या झाडांची हानी समाविष्ट आहे—कोणतीही पारदर्शक व अधिकृत नोंद प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारे शासनाने आदिवासी शेतकरी व समाजाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.


“आज आमचे आजोबा-पणजोबा गेले, एक पिढी संपत आली आणि दुसरी पिढीही त्याच अन्यायाच्या ओझ्याखाली दबली आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार?” हा प्रश्न आजही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना छळतो आहे. ‘आज नाही तर उद्या मोबदला मिळेल’ या आशेवर जगत शेतकरी गेली चार दशके नाराजीचा सुस्कारा सोडत आहेत. मात्र आता “खूप झाले, संयम सुटत चालला आहे,” अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.


“काहीही झाले तरी मोबदला मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन, घेराव करून संबंधित अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय नाही, असा ठाम निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.


या सर्व विषयावर उप कार्यकारी अभियंता संदीप सरगर, शाखा अभियंता प्रवीण भुसारा यांच्याशी सविस्तर चर्चा करून संबंधित पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता विलास सुमडा, गोवने ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम, विनायक मालकरी, शेतकरी ग्रामस्थ हेमेंद्र पाटील व पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.


प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय न दिल्यास, मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा कडक शब्दांत देत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली



आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने