वसई विरार प्रतिनिधी
वसई : वसई पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ‘लेखणी’ आणि ‘मेणबत्ती’ या प्रतीकात्मक प्रतिकृतींची झालेली दुरवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या स्मारकांची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करूनही वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक आंबेडकरी संघटनांनी केला आहे.
प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी निगडित असलेल्या या प्रतीकांकडे केलेले दुर्लक्ष हे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन महिला आघाडीने प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ‘मनुवादी धोरणा’चा आरोप करत संघटनेने सर्व भीम अनुयायी, महिला व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हे आंदोलन शुक्रवार, १० एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, धम्मदीप बुद्ध विहार समोर, वसई (पश्चिम) येथे होणार आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि स्मारकांच्या दुरुस्तीसंदर्भात कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
