जिल्हा परिषद पालघर
दिनांक 29.06.2026
पालघर जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओसारख्या घातक आजारापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाभर उभारण्यात आलेल्या 2,238 पोलिओ बूथच्या माध्यमातून एकूण 1 लाख 67 हजार 711 लाभार्थींपैकी 1 लाख 48 हजार 87 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली असून, आतापर्यंत 88 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
मोखाडा तालुक्यातील वाशाळा उपकेंद्र येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि ग्रामपंचायत वाशाळाचे सरपंच कृष्णा वाघ यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात बालकांपर्यंत लसीकरणाची सेवा पोहोचविण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात एकूण 2,238 पोलिओ बूथ कार्यरत असून, 1 लाख 67 हजार 711 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 1 लाख 48 हजार 87 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली असून, मोहिमेने 88 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
मोहिमेदरम्यान विविध कारणांमुळे काही बालकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. अशा सर्व बालकांची यादी तयार करण्यात आली असून, आयपीपीआय (IPPI) मोहिमेच्या पुढील तीन दिवसांत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन उर्वरित बालकांचे लसीकरण करणार आहेत. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
"पालघर जिल्हा पोलिओमुक्त ठेवण्यासाठी आरोग्य विभाग आणि सर्व यंत्रणा कटिबद्ध आहे. पालकांनी सहकार्य करून प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस मिळेल, याची खात्री करावी. आगामी तीन दिवसांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे," असे डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात आरोग्य कर्मचारी भेट दिल्यास त्यांना सहकार्य करून प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात यावी. 'एकही बालक वंचित राहणार नाही' या उद्दिष्टाने जिल्हाभर घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असून, आगामी तीन दिवसांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून पोलिओमुक्त पालघर जिल्ह्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
