मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी कोकण नगरच्या प्रलंबित प्रश्नांची वंचित बहुजन आघाडीने केली पाहणी

कोकण नगरच्या प्रलंबित प्रश्नांची वंचित बहुजन आघाडीने केली पाहणी

 विरार | प्रतिनिधी

विरार पश्चिम येथील मनवेलपाडा परिसरातील कोकण नगरमध्ये गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्यांची पाहणी करण्यासाठी रविवारी (दि. २८ जून २०२६) वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे वविशमपा क्षेत्र महासचिव मिलिंद कांबळे, वविशमपा क्षेत्र उपाध्यक्ष व युवा नेते सुविध पवार, पालघर जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोरे तसेच समाजसेवक गणेश चव्हाण उपस्थित होते.


कोकण नगरमधील नागरिकांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. हक्काच्या घराचे स्वप्न दाखवत अनेक गरीब, कष्टकरी व वंचित बहुजन समाजातील कुटुंबांची बिल्डरांकडून फसवणूक झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. कोणतेही नियोजन न करता दाटीवाटीने चाळी उभारण्यात आल्याने येथील रहिवाशांना चाळींपासून मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी साधी पायवाटदेखील उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली.


गेल्या १२ ते १३ वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी सातत्याने संघर्ष करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.


यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या न्याय्य मागण्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. कोकण नगरमधील रहिवाशांना हक्काचा रस्ता व इतर मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

.

स्थानिक नागरिकांनीही आपल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या या पुढाकाराचे स्वागत करत, आपल्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाच्या माध्यमातून लढा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.



जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने