मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

 बुलढाणा, प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीने भव्य व शिस्तबद्ध मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अल्पावधीत नियोजन करून आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि बहुजन-आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषदेत केलेल्या, "एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा," या प्रेरणादायी विचाराला अभिवादन म्हणून या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.


सामाजिक न्याय, शिक्षण, शेती, आरक्षण आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक योगदान देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा जागर करण्याच्या उद्देशाने सम्यक समन्वय समितीने शहरातील विविध समविचारी संस्था, संघटना आणि प्रतिष्ठित नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते.


मिरवणुकीची सुरुवात जयस्तंभ चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.


ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, यश सिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाल्याने मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. "बहुजनांचे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


जयस्तंभ चौकातून सुरू झालेली मिरवणूक एसबीआय चौक मार्गे आयडीबीआय चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. येथे सैनिकांनी मानवंदना दिली, उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रगीताने या ऐतिहासिक मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.



अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीचे शहरभर कौतुक होत असून, बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच शाहू महाराज जयंतीनिमित्त अशा स्वरूपाची मिरवणूक यशस्वीपणे पार पडल्याने सम्यक समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने