मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बुलढाण्यात प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बुलढाण्यात प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन


 


बुलढाणा, दि. २४ : बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरक्षण, शेती, उद्योग आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य करणारे पुरोगामी राजे तथा समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांपासून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, एसबीआय चौक मार्गे ही मिरवणूक आयडीबीआय चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचेल. तेथे शाहू महाराजांना मानवंदना अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे

.

कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे तसेच विविध समाजघटकांतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करणारे शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रणेते मानले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव आणि विचारांचा जागर करण्यासाठी जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार सम्यक समन्वय समितीने केला आहे.


या मिरवणुकीत महाबोधी महाविहार धम्मगिरी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बारा बलुतेदार महासंघ तसेच शहरातील विविध बहुजनवादी, पुरोगामी आणि समविचारी संस्था, संघटना व बुद्ध विहार समित्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.


सम्यक समन्वय समितीच्या सदस्यांनी बुलढाणा शहरातील सर्व समाजघटकांतील नागरिकांना या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.


जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने