पालघर, दि. २२ जून : पालघर जिल्हा पोलिसांनी घरफोडीच्या सात गुन्ह्यांची उकल करत सुमारे ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.
डहाणू तालुक्यातील वाडी येथील रहिवासी सतीश शरदचंद्र बचे (वय ५७) यांच्या घरात १६ मार्च २०२५ रोजी अज्ञात चोरट्यांनी खिडकीची ग्रील तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ९.९९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डहाणू तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे
तपासादरम्यान खालील सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली :
घोलवड पोलीस ठाणे गुन्हा क्र. ४१/२०२५ – भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे.
घोलवड पोलीस ठाणे गुन्हा क्र. ५१/२०२५ – भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे.
घोलवड पोलीस ठाणे गुन्हा क्र. १०९/२०२५ – भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे.
डहाणू पोलीस ठाणे गुन्हा क्र. ६२/२०२५ – भारतीय न्याय संहिता कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे.
डहाणू पोलीस ठाणे गुन्हा क्र. १४२/२०२४ – भारतीय न्याय संहिता कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे.
वाणगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र. १०४/२०२४ – भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे.
वाणगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र. ६३/२०२५ – भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे.
पोलिसांनी आरोपींकडून ७ तोळे सोने, १ किलो चांदी, १ लाख १ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जॅग्वार कंपनीचे घड्याळ असा एकूण ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
