दि. 14 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव 2026 अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि लोकसहभागातून हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने पालघर वनपरिक्षेत्रातील वडाचा पाडा, बहाडोली येथील वनक्षेत्रात भव्य वृक्षारोपण व बीजगोळे प्रक्षेपण कार्यक्रम
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वन विभाग, ग्रामपंचायत बहाडोली आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि वनप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा सामूहिक संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध देशी वृक्षप्रजातींच्या 100 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली. यानंतर वनक्षेत्रात बीजगोळ्यांचे (Seed Balls) 3000 प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून भविष्यात नैसर्गिकरीत्या अधिकाधिक वृक्षांची निर्मिती होऊन वनक्षेत्राची समृद्धी वाढावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुशील नांदवटे यांनी सांगितले की,
सध्या वाढते जागतिक तापमान, हवामान बदल, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट, जैवविविधतेवर वाढणारे संकट आणि जंगलांचे कमी होत चाललेले क्षेत्र ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून वृक्षसंवर्धन हा सर्वात परिणामकारक पर्याय आहे.
त्यामुळे शासनाच्या विविध वृक्षलागवड अभियानांमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले."वन महोत्सव हा केवळ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नसून पर्यावरणाबद्दलची सामूहिक जबाबदारी जागृत करणारा सामाजिक उत्सव आहे.
वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून तो मोठा होईपर्यंत त्याची जबाबदारी स्वीकारली, तर हरित महाराष्ट्राचे स्वप्न निश्चितच साकार होईल."
सदर कार्यक्रमास डहाणू वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. निरंजन दिवाकर, सहाय्यक वनसंरक्षक श्री. रामानुजी बांगर यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुधीर भांडवलकर , श्रीमती सुनीता पाटील सरपंच बहाडोली, राहुल पाटील उपसरपंच बहाडोली,विनोद बरफ,संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद पाटील,वनअधिकारी भरत
पवार,सुशील विसपुते , प्रदीप सुतार, सुनील घुटे, प्रमोद घेगड,निकिता गवळी, वृषाली वरठा, सोनाली झूगरे, प्रदीप कांबडी , कांबळे, निखिल हमरे, सविता पाटील, विजय पाटील,विलास पाटील वनिता पाटील, साधना पाटील, मंदार पाटील, राजू कुडू, वैभव पाटील तसेच स्वयंसेवी संस्था आणि वनप्रेमींनी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
यावेळी प्रा सुधीर भांडवलकर सर यांनी नागरिक,वन कर्मचारी,युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन हरित महाराष्ट्र आणि हरित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातील विचारांचा संदर्भ देत त्यांनी वृक्ष हे केवळ नैसर्गिक साधन नसून मानवाचे खरे सगे-सोयरे असल्याचे सांगितले. वृक्षांचे जतन म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. संत तुकाराम महाराजांनी निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा दिलेला संदेश आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण पर्यावरणविषयक धोरणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांनी किल्ले, जंगल आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला होता. रयतेच्या उपयोगासाठी असलेल्या फळझाडांची विनाकारण तोड होऊ नये तसेच जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी त्यांनी कठोर आदेश दिले होते. शिवाजी महाराजांचा निसर्ग संवर्धनाचा हा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरणाबाबत नवचेतना निर्माण करून भविष्यात शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे सांगत, प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन श्री. भांडवलकर यांनी केले.
मार्गदर्शनादरम्यान उपस्थितांना देशी वृक्षप्रजातींचे पर्यावरणीय महत्त्व, योग्य ठिकाणी योग्य प्रजातींची निवड, पावसाळ्यातील वृक्षलागवडीची शास्त्रीय पद्धत, रोपांचे संरक्षण, जलसंधारण, मृदा संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यात वृक्षांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. वृक्ष हे केवळ ऑक्सिजनचे स्रोत नसून मातीची धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन, वन्यजीवांना अधिवास उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे यामध्ये त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते बीजगोळे प्रक्षेपण अभियान. माती, शेणखत आणि विविध देशी वृक्षांच्या बियांपासून तयार करण्यात आलेले बीजगोळे वनक्षेत्रात प्रक्षेपित करण्यात आले. पावसाळ्यात हे बीजगोळे नैसर्गिकरीत्या अंकुरून भविष्यात नवीन वृक्ष निर्माण होण्यास मदत करणार आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी कमी खर्चात, लोकसहभागातून आणि नैसर्गिक पद्धतीने वृक्षसंवर्धन करण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी भविष्यातही वन विभागाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
वन विभागाने राबविलेल्या या उपक्रमामुळे शासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असून लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत असून वन महोत्सवाच्या माध्यमातून त्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत बहाडोली, संयुक्त वन व्यवस्थापन समिती बहाडोली तसेच पालघर वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक चळवळीचे स्वरूप यावे आणि भविष्यात अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वन महोत्सवाच्या निमित्ताने बहाडोली येथे झालेला हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संरक्षण, लोकसहभाग आणि हरित भविष्यासाठीचा एक प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. शासन, वन विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशीच हरित चळवळ राज्यभर बळकट होत राहील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली
"वन महोत्सव हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, समृद्ध आणि हरित पर्यावरण देणे शक्य होईल. वन विभाग लोकसहभागातून हरित महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध आहे."
श्री. सुशील गंगाधर नांदवटे वनपरिक्षेत्र अधिकारी,पालघर
"पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. वन विभागाने राबविलेले वृक्षारोपण व बीजगोळे प्रक्षेपण यांसारखे उपक्रम भविष्यातील पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन हरित पालघर आणि हरित महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान द्यावे.”. -प्रा सुधीर भांडवलकर
