पालघर, दि. ७ : पालघर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंबांपुढे बाहेर जाणे शक्य होत नव्हते
. अशा संकटाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पालघर शहर मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ४०० जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले.
दि. ६ जुलै रोजी भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पालघर शहर मंडळाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. मुसळधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली अर्पण केली.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘अंत्योदय’ या विचारातून प्रेरणा घेत भाजपा पालघर शहर मंडळाचे अध्यक्ष अॅड. जयेश रघुनाथ आव्हाड यांनी पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर मंडळाचे दोन्ही सरचिटणीस, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालघर (पूर्व) येथील धापशी पाडा आणि गणेश नगर परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी ज्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरले होते तसेच ज्यांच्या घरात चूल पेटली नव्हती अशा गरजू नागरिकांना ४०० जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या मदतकार्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
भविष्यातही गरजू आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी भाजपा पालघर शहर मंडळ सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
