पालघर, प्रतिनिधी : इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या ३१ व्या पदग्रहण समारंभात नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारत समाजसेवेच्या नव्या पर्वाला उत्साहात सुरुवात केली. पालघर (पूर्व) येथील दादोबा ठाकूर हॉलमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात सन २०२६-२७ साठी अँड. अनुश्री जयेश आव्हाड यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली.
नवीन कार्यकारिणीत सचिव म्हणून मृदुला सावे, उपाध्यक्षा शमीम मर्चंट, आयपीपी अँड. विनिता पाटील, खजिनदार चिस्तियाना धनानी, आयएसओ अमिता पाटील आणि सीसी मनीषा करंजीकर यांचा समावेश आहे. यावेळी माजी अध्यक्षा अँड
. विनिता दिपेश पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नव्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली.
अँड. विनिता पाटील यांच्या नेतृत्वाखालील ३० वे वर्ष समाजसेवा, समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीने गाजले. त्यांच्या कार्यकाळात क्लबने सुमारे ५० लाख रुपयांहून अधिक मूल्याचे विविध समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत क्लब तसेच डिस्ट्रिक्ट ३१४ तर्फे संपूर्ण पर्ल टीमचा विशेष गौरव करण्यात आला.
या समारंभाला पास्ट असोसिएशन प्रेसिडेंट पुष्पा सूर्यमुर्ती या प्रमुख पाहुण्या म्हणून, तर रोटरी अध्यक्ष भूषण सावे हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. इन्स्टॉलेशन चेअरमन पीपी स्वाती आणि सोनाली यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
कार्यक्रमादरम्यान क्लबच्या ३० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा प्रेरणादायी आढावा सादर करण्यात आला. तसेच, क्लबच्या सर्व माजी अध्यक्षांचा विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
"सेवेतून समाजपरिवर्तन" हा मूलमंत्र कायम ठेवत नव्या कार्यकारिणीने अधिक व्यापक आणि प्रभावी समाजसेवेचा संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षातील यशस्वी कामगिरी हीच आगामी वाटचालीची प्रेरणा ठरणार असून, इनर व्हील क्लब ऑफ पालघर समाजसेवेची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
