मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघरमधील पूरस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी* ; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अभ्यासगट स्थापन करण्यात येणार.!

पालघरमधील पूरस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी* ; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अभ्यासगट स्थापन करण्यात येणार.!


 *पालघर जिल्हा प्रतिनिधी 


पालघर, दि. ७ जुलै २०२६ : हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.



दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी जव्हार, मनोर तसेच जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. तसेच पालघर–जव्हार मार्गावरील विक्रमगड तालुक्यातील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.


यावेळी खासदार हेमंत सावरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रांताधिकारी अपूर्वा बासुरे, सहायक जिल्हाधिकारी अमोल पी., जलसंपदा विभागाच्या अभियंता वैशाली नारकर, वाडा येथील प्रांताधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत सुमारे १,२०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांची तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात विविध पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.


यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पूरग्रस्त भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितस्थळी पोहोचविणे, कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे तसेच मदत व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.


पालघर जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नामांकित संस्थेकडून वैज्ञानिक अभ्यास करण्यात येणार असून, त्याआधारे शासन लवकरच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.


यानंतर मंत्री महाजन यांनी  माहीम केळवा (झांझरोली). धरणाचीही पाहणी केली. मुसळधार झालेल्या पावसामुळे धरणाच्या मातीभरावाचे अश्मपटल (पिचिंग)  ढासळले होते त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित

 अधिकाऱ्यांना दिल्यात. यावेळी मंत्री महाजन यांनी मात्रेवाडी तसेच केळवा माहीम धरणालगतच्या गावातील गावकऱ्यांची देखील भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. गावकऱ्यांच्या मागणीनुसार दोन वस्त्यांना जोडणारा पूल उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.



राज्य शासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

-----------------------------------

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने