मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर ‘मिनी सरस’चा दिमाखदार समारोप; महिला बचत गटांची ५० लाखांची उलाढाल

पालघर ‘मिनी सरस’चा दिमाखदार समारोप; महिला बचत गटांची ५० लाखांची उलाढाल


पालघर
: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या 'उमेद' अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘पालघर मिनी सरस’ प्रदर्शनाचा सोमवारी उत्साहात समारोप झाला. या पाच दिवसांच्या प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांनी तब्बल ५० लाख रुपयांची विक्रमी उलाढाल करत आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा गाठला आहे.

"माझे स्वप्न पूर्ण झाले" – रवींद्र शिंदे

समारोप प्रसंगी बोलताना पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे भावूक झाले. ते म्हणाले, "उमेद अंतर्गत महिला गटांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपर्यंत पोहोचावी हे माझे स्वप्न होते. मिनी सरसच्या माध्यमातून महिलांनी ही किमया साधली असून माझे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. महिलांनी अशाच संधींचा फायदा घेतल्यास १ कोटींचा टप्पा गाठणे कठीण नाही."

यशस्वी गटांचा गौरव

प्रदर्शनात सर्वाधिक विक्री करणाऱ्या आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या गटांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये पालघर तालुक्यातील गटांनी विशेष ठसा उमटवला.

विजेते गट खालीलप्रमाणे:

  1. जनरल स्टॉल: प्रथम - उन्नती स्वयंसहायता समूह (पालघर), द्वितीय - वारली आर्ट (विक्रमगड), तृतीय - स्वामिनी स्वयंसहायता समूह (पालघर).
  2. फूड स्टॉल (खानावळ): प्रथम - सागरिका, द्वितीय - शिवनेरी, तृतीय - श्रीराम समर्थ (तिन्ही गट पालघर तालुक्यातील).
  3. विशेष सन्मान: श्री स्मरण (पालघर), महालक्ष्मी (धुळे), यशोदा (रत्नागिरी), महालक्ष्मी (डहाणू) आणि स्वप्नपूर्ती (जव्हार).
  4. उत्कृष्ट नियोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक रवी बोबडे, राजश्री माने आणि प्रभूदास गावित यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

ग्रामीण उत्पादनांना मोठी बाजारपेठ

या महोत्सवामुळे पालघरसह इतर जिल्ह्यांतील महिला गटांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि सर्व जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. "पाच दिवस ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महिलांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे," असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, दीपेश ठाकूर, अतुल पारसकर, पल्लवी सस्ते, सरपंच घनश्याम मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांनी आपल्या मनोगतातून 'उमेद' अभियानामुळे मिळालेल्या आर्थिक बळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने