जव्हार, दि. २० फेब्रुवारी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या वतीने प्रकल्पस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात संघभावना, समन्वय आणि कार्यऊर्जा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप चैतन्यमय वातावरणात पार पडला. भारतरत्न राजीव गांधी मैदान, जव्हार येथे रंगलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साह, क्रीडाभावना आणि टीमवर्कचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या क्रीडा स्पर्धांचा समारोप प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी यांनी केले. स्पर्धा आयोजनामागील उद्दिष्ट, नियोजन प्रक्रियेत आलेले अनुभव तसेच सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदाऱ्या पार पाडताना आलेल्या आव्हानांवर मात करत यशस्वी आयोजन साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, धावणे, हँडबॉल आणि क्रिकेट आदी विविध क्रीडा प्रकारांत झालेल्या सामन्यांनी उपस्थितांना थरारक क्षणांचा अनुभव दिला. विजयी संघांना चषक प्रदान करण्यात आले, तर वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अपूर्वा बासूर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी-कर्मचारी व आयोजकांचे अभिनंदन केले. “सर्वांच्या चेहऱ्यांवरील समाधान आणि उत्साह पाहता या स्पर्धेचा उद्देश साध्य झाल्याचे स्पष्ट जाणवते,” असे त्या म्हणाल्या. दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीमुळे काही शिक्षकांना सहभागी होता आले नसल्याची खंत व्यक्त करत, भविष्यात अधिक व्यापक सहभागाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या समारोप सोहळ्यास विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे यांनी आभार प्रदर्शन केले. अखेरीस ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत सामूहिकरित्या गाऊन प्रेरणादायी वातावरणात क्रीडा महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
