वसई-विरार प्रतिनिधी :
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रलंबित नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज महानगरपालिका महापौरांची भेट घेतली. महासचिव मा. मिलिंद सोमा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने शहरातील पायाभूत सुविधा, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि विकासकामांशी संबंधित विविध मुद्द्यांवर महापौरांचे लक्ष वेधले.
या शिष्टमंडळामध्ये उपाध्यक्ष मा. सुविध पवार, उपाध्यक्षा मा. प्रेरणाताई भेकरे, प्रमुख संघटक मा. दिलीप साळुंके, विरार शहर उपाध्यक्ष मा. सनी कांबळे, माजी वसई तालुकाध्यक्ष मा. प्रफुल्ल हळदे, युवा आघाडीचे मा. फिरोज शेख तसेच मा. दिपक जाधव यांचा समावेश होता. पदाधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
महापौरांच्या दालनात त्या वेळी कामकाजाचा मोठा व्याप आणि तातडीची बैठक नियोजित असतानाही त्यांनी शिष्टमंडळाची दखल घेतली. बैठकीकडे जात असतानाच त्यांनी शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. शहराच्या विकासाशी संबंधित मुद्दे आणि नागरिकांच्या तक्रारींवर लवकरच स्वतंत्र व सविस्तर बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
दरम्यान, कोकण नगर परिसरातील महि
लादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे संभाव्य उमेदवार मा. अमोल घोंगडे आणि वसई तालुका उपाध्यक्ष मा. भरत मोरे यांनीही उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शहरातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करत राहील, असा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
