पालघर प्रतिनिधी
मौजे वेढी येथे २९ मार्च हा दिवस केवळ नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा, जागृतीचा आणि ऐतिहासिक स्मृतींचा साक्षीदार आहे. १९३६ साली याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाज परिषदेला संबोधित करत सामाजिक परिवर्तनाचा दीप प्रज्वलित केला होता. त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण जपण्यासाठी वेढी येथील बोधी वृक्ष मंडळ दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आले आहे.
यंदाही या परंपरेला साजेसा भव्य आणि विचारप्रवर्तक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, समाजप्रबोधनाचा संदेश अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सारनाथ बुद्ध विहार येथे बुद्ध वंदनेने होणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आवारात महामानवांना मानवंदना अर्पण केली जाईल.
सकाळी साडेदहा वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होणार असून, १०:४५ वाजता प्रस्तावना मांडली जाईल. सकाळी ११ वाजता प्रमुख वक्ते अॅडव्होकेट किरण चने (अध्यक्ष, बार असोसिएशन भिवंडी) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हंसनालकर उपस्थित राहणार असून, त्यांच्या विचारांमधून सामाजिक बांधिलकीचा वेध घेतला जाणार आहे.
दुपारी १ वाजता भोजनाची व्यवस्था असून, दुपारी ३ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन बोधी वृक्ष मंडळ वेढी व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अशा ऐतिहासिक दिवसांचे स्मरण केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित न ठेवता, त्यातून प्रेरणा घेऊन समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांची अंमलबजावणी करणे हीच खरी बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. वेढीतील हा उपक्रम त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले पाहिजे.
