मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बोधी वृक्ष मंडळाच्या वतीने मौजे वेढी येथील ऐतिहासिक भूमीत एल्गार दिवस साजरा

बोधी वृक्ष मंडळाच्या वतीने मौजे वेढी येथील ऐतिहासिक भूमीत एल्गार दिवस साजरा

 *

*राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने सफाळे ते ऐतिहासिक भूमी मौजे वेढी गावापर्यंत महामानवाला रथातून अभिवादन*


*हजारो अनुयायी आणि बहुजन बांधवांनी महामानवाला केले अभिवादन*


पालघर (प्रतिनिधी) : 29 मार्च या दिवसाला पालघर जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण 29 मार्च 1936 रोजी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सोबत असलेले सहकारी ह्यांचे सकाळी 11.00 वाजता सफाळे स्टेशन येथे आगमन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार म्हणून अस्पृश्य समाजाने एक दोन दिवस अगोदरच मोटर लॉरीची तसेच टांग्याची तजवीज करून ठेवली होती. परंतु आदल्यादिवशी म्हणजे 28 मार्च 1936 रोजी स्पृश्य समाजाच्या सांगण्यावरून मोटर लॉरीची, टांग्यावाल्यांची बैठक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकारी लोकांना टांग्यात बसवू नये असं ठराव करण्यात आला होता. 


                     29 मार्च 1936 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले सहकारी सोबत घेऊन मुबईहून अस्पृश्य परिषदेसाठी रवाना झाले. वसई स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले असता चर्मकार बांधवांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून जयघोष केला. सकाळी 11.00 वाजता सफाळे स्टेशन येथे उतरले असता, सफाळे स्टेशन बाहेर डॉ. बाबासाहेबांना वाहनात बसवण्यात आले. परंतु आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे मोटारवाल्याने 


आपली मोटार नादुरुस्त असल्याचे सांगितले तेव्हा सर्व टांग्यात बसू लागले. परंतु टांग्यावाल्यांनी अस्पृश्य मंडळींना आमच्या टांग्यात बसून आम्ही नेणार नाही व तुमचे भाडे न करण्याचा आमचा संप आहे असे स्पष्ट सांगितले. संपाची भाषा ऐकताच सर्वांनी पायी चालत मौजे वेढी गावी जाण्याचा निर्धार केला. इतक्यात संपात सामील असलेला एक मुसलमान टांगेवाला फुटून भाडे घेण्यास तयार झाला. संपातून एक टांगेवाला फुटल्याने आणखी तीन भंडारी समाजाचे टांगेवालेही संपातून बाहेर पडून भाडे घेऊन जाण्यास तयार झाले. 


अशा प्रकारे चार टांग्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबत असलेले सहकारी अस्पृश्य परिषद असलेल्या ठिकाणी जाण्यास निघाले. आपण टांग्यात बसलेलो असताना आपले अनुयायी आपल्या पाठीमागे पायी चालत व धावत असल्याने बाबासाहेब टांग्यातून खाली उतरले व सफाळे स्टेशन ते मौजे वेढी या गावी पायी चालत जाऊन बाबासाहेबांनी अस्पृश्य परिषदेला संबोधित केले होते. हे त्यावेळीचे ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन होते. मौजे वेढी या ऐतिहासिक गावी बाबासाहेबांना ऐकण्यासाठी भीम अनुयायी आणि बहुजन बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवित प्रचंड गर्दी केली होती.


                   खरंतर ही निव्वळ अस्पृश्य परिषद नव्हती तर शोषित पीडित वंचित समूहांच्या मुक्तीचा मार्ग होता. सदर परिषदेला संबोधित करताना बाबासाहेबांनी "मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे" असे ऐतिहासिक भाषण 29 मार्च 1936 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले होते. तसेच महत्त्वाचे नऊ ऐतिहासिक ठराव घेण्यात आले होते. 

                       आपल्या पूर्वजांचा ऐतिहासिक व जाज्वल इतिहास जतन तसेच प्रेरणाभूमीला अभिवादन करून , एल्गार दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातुन व जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून बौध्द बांधव व बहुजन बांधव हजारोंच्या संख्येने मौजे वेढी या ऐतिहासिक गावाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी *प्रेरणाभूमीला* येत असतात व विचाराने प्रेरित होत असतात.


               या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व साधून बोधी वृक्ष मंडळ वेढी या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन या ऐतिहासिक भूमीत केले जाते. यावर्षीही मंडळाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. सकाळी 9.00 वाजता सारनाथ बुद्ध विहारात सुत्रपठण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता ऐतिहासिक प्रेरणाभूमीत महामानवाला हजारो बहुजन बांधवांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. मंडळाचे सचिव राजेश राणे यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले.


 यावेळी प्रमुख वक्ता अँड किरण चन्ने अध्यक्ष भिवंडी कोर्ट बार असोसिएशन महाराष्ट्र व सचिव आरपीआय सेक्युलर तसेच प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश हसनालकर साहेब समाज कल्याण अधिकारी जिल्हापरिषद पालघर यांनी आपल्या आक्रमक आणि परखड वक्तृत्व शैलीने उपस्थित बौद्ध बांधवांना आणि बहुजन बांधवांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने भगिनी नंदिनी जाधव यांनी करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. मंडळाचे महेश शेलार, राजेश राणे, किर्ती शेलार व मंडळाच्या सभासदांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता सहभोजनाचे करण्यात आली.  


            

                       सालाबादाप्रमाणे राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने सफाळे स्टेशन ते मौजे वेढी या ऐतिहासिक भूमीपर्यंत महामानवाला रथात विराजमान करून दिलेली मानवंदना हे संपूर्ण कार्यक्रमाचे मानबिंदू ठरले. यासाठी पँथरच्या सफाळे विभागाने विशेष मेहनत घेतली. यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, बौद्ध अनुयायी, बहुजन बांधव आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने