प्रतिनिधी / अमरावती
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श उपक्रम वडाळी येथे पाहायला मिळाला. दिव्य सदन सोशल सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या गौरव सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
संस्था वर्षभर वंचित, उपेक्षित, विधवा, वृद्ध तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असते. समाजातील दुर्बल घटकांना आधार देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून ऍड. शितल तायडे आणि राजेश राजपूत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सन्मानार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात संस्थेने होमगार्ड प्रशिक्षण तसेच महिलांसाठी स्वच्छता प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींचे प्रमाणपत्र वितरणही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास दिव्य सदन सोशल सेंटर वडाळीच्या स्टाफ डायरेक्टर सिस्टर जोसना, सिस्टर कॅथराईन, सिस्टर अल्काराणी, सिस्टर अलबीना यांच्यासह प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अक्षय आठवले, आम्रपाली बडगे, कविता गणवीर, माया इंदोलो, रमा वाकोडे, विद्या काकडे, सुरेंद्र सिरसाट, रवी मोरे, सौरव अवसरमोल, अवधूत गेडाम, पवन चौधरी, आशिष राखोंडे, तसेच सिक्युरिटी गार्ड ट्रेनर प्रफुल भुसारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजसेवेची प्रेरणा देत एक सकारात्मक संदेश दिला.
