पालघर प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील दांडा खटाळी येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेविका यांच्या मनमानी पद्धतीने खाजगी जागेमधून काँक्रिटीकरण रस्ता करण्यात येत असल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित जागेमालकांची कोणतीही सहमती न घेता हे काम सुरू करण्यात आल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील जागेमालक किशोर गणपत पाटील यांनी प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेतून रस्ता काढताना त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, तसेच कोणतीही लेखी अथवा मौखिक परवानगीही घेण्यात आलेली नाही.
नियमांनुसार खाजगी जमिनीवर सार्वजनिक काम करताना संबंधित जमीनमालकाची सहमती घेणे बंधनकारक असताना, येथे त्या प्रक्रियेला पूर्णतः बगल देण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे नागरिकांच्या मालकी हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत असून गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांचे हक्क डावलले जात असतील, तर ही बाब गंभीर असून संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

