पंढरपूर : शहरात आयोजित करण्यात आलेल्या बहुजन बौद्ध धम्मदीक्षा समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धम्म रॅलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येत बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता केली. या रॅलीत सामाजिक ऐक्य, समता आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान समाजकारणात मोलाची कामगिरी बजावलेल्या दिवंगत नेत्यांचा गौरव करण्यात आला. स्मृतीशेष माजी आमदार भारत नाना भालके तसेच स्मृतीशेष गणपत आबा देशमुख यांना मरणोत्तर “आदर्श लोकप्रतिनिधी” सन्मान पुरस्कार देण्यात आला. यासोबतच विद्यमान आमदार अभिजित (आबा) पाटील आणि आमदार राजू खरे यांनाही त्यांच्या कार्याची दखल घेत “आदर्श लोकप्रतिनिधी” सन्मानाने गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला तो प्रबुद्ध साठे यांनी आपल्या आई जनाबाई साठे यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याचा. आईला समतेच्या, प्रज्ञेच्या आणि करुणेच्या मार्गावर नेण्याचा हा प्रसंग उपस्थितांच्या मनाला भिडणारा ठरला. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कुटुंब पातळीवर होणारे असे प्रयत्न नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
एकंदरीत, पंढरपूरातील हा धम्मदीक्षा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक जागृती, विचारप्रवर्तन आणि परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला
