#पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला (NOC) आणि सामान्य पावती देण्यासाठी ही लाच मागितल्याचे समोर आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संध्या संजय पाघरे (वय ४४) यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ४ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला स्वतःचा डाय-मेकिंग (अॅम्बॉस कटिंग) व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा NOC आवश्यक होता.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १३ मे २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंचांनी तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पालघर ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

