प
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या विशेष पुढाकारातून बहाडोली गावासाठी वन विभागामार्फत "बहाडोली जांभूळ फळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प" मंजूर करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, योग्य व हमीभाव, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे
.
बहाडोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), पालघर श्री. सुशील ग. नांदवटे, वनपाल श्री. पवार, वनरक्षक श्री. घेगड, सरपंच श्रीमती सुनीता पाटील, उपसरपंच श्री. राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील मेघा पाटील
विनोद परब विनोद कीणी मंदार पाटील, ग्रामपंचायत सचिव तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यापूर्वी ग्रामसभेचा आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने काही वेळा ग्रामसभा तहकूब करावी लागली होती. मात्र गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नांदवटे यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची प्रक्रिया, आर्थिक लाभ, रोजगार निर्मिती आणि भविष्यातील विकासाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बहाडोली गावातील सुमारे 60 ते 70 टक्के शेतकरी जांभूळ उत्पादनाशी संबंधित असून गावाच्या अर्थकारणामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जांभूळ हंगामाच्या सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळत असला तरी हंगामाच्या अखेरीस दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, वाहतूक अडचणी, बाजारपेठेतील चढ-उतार आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जांभूळ फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रिया उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जांभूळ पल्प, स्क्वॅश, सिरप, ज्यूस, जॅम, जेली, व्हिनेगर, आरोग्यपूरक उत्पादने तसेच निर्यातक्षम प्रक्रिया उत्पादने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकडून जांभूळाची थेट खरेदी करण्यात येणार असून "एक गाव – एक भाव" या संकल्पनेनुसार सर्व उत्पादकांना समान व पारदर्शक दर उपलब्ध करून दिला जाणार आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता राखण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता नियमानुसार शेतकऱ्यांना वेळेत मोबदला देण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभेमार्फत संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFMC), बहाडोली ची स्थापना करण्यात आली. समितीसाठी एकूण 24 सदस्यांची निवड करण्यात आली असून श्री. विकास पाटील यांची अध्यक्षपदी तर श्रीमती दृश्या पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शासन निर्णयानुसार समितीमध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. ग्रामविकास, वनसंवर्धन आणि उद्योग व्यवस्थापनामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
उद्योग उभारणीसाठी सुमारे 6000 ते 8000 चौरस फूट क्षेत्रामध्ये अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये फळ संकलन, वर्गीकरण (ग्रेडिंग), प्रक्रिया, उत्पादन निर्मिती, पॅकिंग, शीतसाखळी सुविधा, साठवणूक व गुणवत्ता नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), पालघर श्री. सुशील ग. नांदवटे यांनी सांगितले की,
ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग आणि सहकार्याच्या बळावर हा प्रकल्प राज्यातील एक आदर्श ग्रामीण मूल्यवर्धन उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योग उभारणीच्या तसेच संचालनाच्या कालावधीत स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग, गोदाम व्यवस्थापन, विपणन, वाहतूक, तांत्रिक सेवा आणि प्रशासकीय कामकाजामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.प्रकल्पासाठी आवश्यक असलेले तज्ञ, तंत्रज्ञ, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, विपणन तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांचे मानधन संबंधित व्यवस्थापन संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. तसेच स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग संचालनामध्ये प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे.
उद्योगाचे व्यवस्थापन प्रारंभीच्या पाच वर्षांसाठी अनुभवी आणि पात्र संस्थेमार्फत करण्यात येणार असून Food Safety and Standards Act (FSSAI), कंपनी कायदा, किमान वेतन कायदा, कामगार कायदे, पर्यावरणीय नियम, विपणन व्यवस्था, ब्रँडिंग, ई-कॉमर्स, निर्यात संधी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आवश्यकतांचा विचार करून उद्योगाचे व्यावसायिक पद्धतीने संचालन करण्यात येणार आहे.
उद्योग स्थिर झाल्यानंतर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती सक्षम झाल्यानंतर ग्रामसभेच्या निर्णयानुसार उद्योग व्यवस्थापनाचे हस्तांतरण समितीकडे करण्याबाबत विचार करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात हा उद्योग पूर्णपणे ग्रामस्थांच्या मालकीचा आणि सहभागातून चालणारा ग्रामीण उद्योग म्हणून विकसित होऊ शकतो.
बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होईल. स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळून ग्रामीण भागातील मूल्यवर्धन उद्योगांना नवी दिशा मिळेल.
ग्रामसभेमध्ये उपस्थित ग्रामस्थांनी प्रकल्पास उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला व प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच श्री. राहुल पाटील यांनी ग्रामपंचायत बहाडोलीच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पालघर श्री. सुशील ग. नांदवटे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प हा शेतकरी, ग्रामस्थ, वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून साकार होणारा ग्रामीण विकासाचा आदर्श नमुना ठरणार असून पालघर जिल्ह्यातील मूल्यवर्धन आधारित ग्रामविकासासाठी एक नवा मानदंड निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
“बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प हा केवळ एक उद्योग नसून शेतकरी, ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्या सहभागातून उभारला जाणारा ग्रामीण आर्थिक विकासाचा एक आदर्श नमुना आहे. या प्रकल्पामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर व विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होईल, स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गावाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प राज्यातील एक आदर्श मूल्यवर्धन उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे."
-श्री. सुशील ग. नांदवटे
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), पालघर
"जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, युवकांना रोजगार आणि गावाला आर्थिक स्वावलंबन देण्याच्या उद्देशाने वन विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. बहाडोलीचा हा प्रयोग भविष्यात इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरेल."
-श्री निरंजन दिवाकर उपवनसंरक्षक डहाणू
