मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी मासवण बंधारा परिसरात सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे स्वच्छता अभियान

मासवण बंधारा परिसरात सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे स्वच्छता अभियान


 


पालघर (प्रतिनिधी) : पालघर तालुक्यातील मासवण बंधारा परिसरात कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभाग यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत परिसराची स्वच्छता करून नागरिकांसमोर स्वच्छतेचा संदेश दिला.


पालघर जिल्ह्यातील पंचक्रोशीतील दशक्रिया विधी व उत्तरकार्यासाठी मासवण बंधारा परिसर महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र, विविध विधींनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य, प्लास्टिक कचरा, काढलेले केस, वापरलेली मडकी, तसेच पुरामुळे आलेला चिखल व गाळ साचला होता. त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्यासाठी युवक मंडळाच्या कार्यकारिणीने पुढाकार घेतला.


या अभियानांतर्गत बंधारा परिसरातील चिखल व गाळ काढणे, काटेरी झुडपे व वाढलेले गवत हटविणे, कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावणे, तसेच नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले. परिसर अधिक सुंदर व प्रसन्न दिसावा यासाठी विविध फुलझाडांची कुंड्यांमध्ये लागवडही करण्यात आली.


मंडळाचे विश्वस्त उल्हास सातवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष वैभव नारायण पाटील यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, गट कार्यकारिणी तसेच महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता अभियान यशस्वी केले.


यावेळी परिसरातील समाजबांधव व नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत युवक मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. “मासवण बंधारा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सूचना फलकावरील नियमांचे सर्वांनी पालन करावे,” असे आवाहन अध्यक्ष वैभव नारायण पाटील यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे विश्वस्त चेतन पाटील, उल्हास सातवी व मनोज ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सुमित पाटील, भाग्यश्री अधिकारी, चिटणीस मुकेश पाटील, सहचिटणीस पंकज ठाकूर, प्रतिक पाटील, श्रद्धा पावडे आणि खजिनदार जतिन भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले.


कार्यक्रमाची सांगता करताना सचिव मुकेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे मासवण बंधारा परिसराला स्वच्छ व सुशोभित स्वरूप प्राप्त झाले असून, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने