मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा
पालघर प्रतिनिधी 

जिल्हा प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पालघर जिल्हा प्रगत जिल्हा म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावारूपाला येईल

पालकमंत्री गणेश नाईक 

पालघर दि २६ जानेवारी: जिल्हा प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पालघर जिल्हा लवकरच राज्यातच नव्हे तर देशातही प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येईल,” असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा पोलीस परेड मैदान, कोळगाव, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.

मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी खासदार डॉ.हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) रणजित देसाई, वरिष्ठ अधिकारी,शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते

   ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला हि बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले तसेच भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत पालघर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सव्वा लाख कुटुंबांना १३४ कोटी रुपयांची मजुरी देत स्थलांतर रोखणे, महिलांचे स्वावलंबन वाढवणे आणि ग्रामीण अर्थचक्राला गती देणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

प्रस्तावित VB-G-RAM-G योजनेत १२५ दिवस रोजगार हमी देण्याचा मानस असून, मनरेगाचे फलित शाश्वत, पर्यावरणपूरक आणि स्वावलंबी ग्रामविकास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

महत्त्वाकांक्षी बांबू लागवड योजनेत आतापर्यंत १० लक्षांहून अधिक रोपांची लागवड झाली असून, पुढील तीन वर्षांत अंदाजे १ कोटी बांबू निर्मितीमधून ५० कोटी रुपयांचे उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळणार आहे . ‘जलतारा’ या प्रभावी जलसंधारण उपक्रमामुळे मातीची धूप रोखली जात असून एकावेळी साडेतीन लाख लिटर पाणीसाठा होतो. जिल्ह्यात ३ लाख जलतारे प्रस्तावित आहेत. मनरेगा-CSR अभिसरणातून २०० शेततळ्यांची कामे सुरू असून मोखाड्यातील पोशेरा येथे ३४ शेततळे पूर्ण झाली आहेत.

राज्यातील १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत पालघर जिल्ह्यासाठी ५० लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ४५ लाख वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे.

पालघरची ओळख असलेल्या जीआय टॅग मानांकित ‘बहाडोली जांभळा’च्या मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक एकात्मिक प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत चालणाऱ्या या प्रकल्पातून गोठवलेला जांभूळ गर, बी-पावडर आणि आरोग्यदायी सिरका तयार होणार असून ‘महाब्रँड’, ‘वनधन केंद्र’ आणि ई-कॉमर्सद्वारे थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी संपून नफा थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचेल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

वनहक्क कायदा २००६ अंतर्गत ६० हजार हेक्टरवरील ५१ हजार ५२९ वैयक्तिक व सामूहिक दावे मंजूर करत पालघर देशात अग्रस्थानी आहे. वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग, अलिबाग-विरार मल्टी-मोडल कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, DFCC रेल्वे मार्ग आणि डहाणू-विरार रेल्वेमुळे जिल्ह्याचा विकास वेगाने साध्य होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. 

वाढवण येथे प्रस्तावित खोल समुद्र बंदर व लॉजिस्टिक पार्कमुळे लाखो रोजगार संधी निर्माण होतील.

ग्रामस्वराज्य, आरोग्य व सामाजिक सुरक्षा

स्वामित्व योजनेत ८३३ गावांचे ड्रोन सर्वेक्षण, ५० हजार मिळकत पत्रिका आणि १६ हजार सनद वितरित करण्यात आले असून महसूलही वाढला आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयांच्या कामगिरीमुळे क्रीडा, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकासाला चालना मिळाली आहे. कामगार कल्याण, लेक लाडकी योजना, PVTG विकास, कुपोषण निर्मूलन, सिकलसेल तपासणी आणि हत्तीरोग निर्मूलन मोहिमांमुळे सामाजिक सुरक्षिततेचा मजबूत पाया घातला जात आहे.

जनता दरबाराच्या माध्यमातून आतापर्यंत २०६५ अर्जांपैकी १८५३ अर्जांवर कार्यवाही पूर्ण करून ९० टक्के नागरिकांना दिलासा देण्यात आला असून येत्या काळात सर्व तालुक्यामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग , वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने