पालघर, दि. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर शहरात आयोजित भव्य पदयात्रेने राष्ट्राभिमान, शौर्य आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. पाचबत्ती चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर पार पडलेल्या या पदयात्रेला जिल्हा प्रशासन, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाले.
सकाळी नेमक्या ७ वाजता जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पदयात्रेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसिलदार रमेश शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि जनतेचा एकत्रित सहभाग हीच या पदयात्रेची खरी वैशिष्ट्ये ठरली
.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सजलेली सांस्कृतिक पथके, ढोल-ताशांचा गजर, तसेच एनसीसी, एनएसएस, स्काऊट-गाईड, माय भारत स्वयंसेवक आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग पदयात्रेला विशेष तेज प्रदान करणारा ठरला. युवा पिढीचा वाढता सहभाग ही राष्ट्रनायकांच्या
विचारांबद्दलची जागरूकता अधोरेखित करणारी बाब आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा अंगीकार करून सुशासन, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रसेवा यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. विविध शासकीय विभागांनी समन्वय साधत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, ही प्रशासनिक कार्यक्षमतेची सकारात्मक झलक मानावी लागेल.
विशेष म्हणजे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना ऑनलाइन प्रशस्तीपत्र देण्याचा अभिनव उपक्रम जाहीर करण्यात आला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न मानला जात आहे.
इतिहासाची प्रेरणा आणि आधुनिक उपक्रमांचा संगम साधणारी ही पदयात्रा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा संस्मरणीय उपक्रम ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
