पालघर, दि. १० मार्च २०२६ : क्रांतीज्योती शिक्षणमहर्षी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात न्याय, समता आणि शिक्षणाच्या मूल्यांची जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आदिवासी एकता परिषद – भूमीसेना यांच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.
संस्थापक अध्यक्ष आप. काळूराम काकड्या धोदडे यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून पालघर जिल्ह्यातील विविध माननीय शासकीय अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.
भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व मानले जाते. आदिवासी, बहुजन, वंचित तसेच सर्वसामान्य नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने संविधानातील मूल्यांनुसार संवेदनशीलता व प्रामाणिकपणे कार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे.
संविधानातील तत्त्वांचा प्रसार होऊन समाजात न्याय, समानता आणि बंधुतेची भावना अधिक बळकट व्हावी, यासाठी सर्व माननीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास आदिवासी एकता परिषद – भूमीसेना यांनी व्यक्त केला आहे.
— जय संविधान !
