मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी; जिद्दीसमोर परिस्थिती हरली

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी; जिद्दीसमोर परिस्थिती हरली


 अकोला (प्रतिनिधी): डाॅ संतोष गायगोले 


उपशीर्षक:

ट्युशनशिवाय एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण; वंचित पदाधिकाऱ्यांकडून कुटुंबासह गौरव


परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, याचा प्रत्यय अकोला तालुक्यातील धोर्तडी येथील मोनाली आठवले हिच्या यशातून आला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दीपक आठवले यांच्या मुलीने कोणतीही खासगी ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


मोनालीचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. वडील गावात मिळेल ते काम तसेच नळ फिटिंगचे मजूर म्हणून काम करतात, तर आई शेतीमजुरी करते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मोनालीने शिक्षणाची वाट सोडली नाही. जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण आणि अकोल्यातील कन्याशाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने शिष्यवृत्तीच्या आधारे एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


विशेष म्हणजे, कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता तिने स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर समाजकल्याण विभागातील लिपिक, उच्च न्यायालयातील बेलिफ आणि सेल टॅक्स विभागातील टॅक्स असिस्टंट या तीनही पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. या तिन्ही यशांपैकी तिने टॅक्स असिस्टंट अधिकारी पदाची निवड केली आहे.


मोनालीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी तिच्या घरी भेट देऊन आई-वडिलांसह तिचा सत्कार केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.


मोनालीने यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांना देताना सांगितले की, “वडील दीपक आठवले हे Balasaheb Ambedkar यांच्या चळवळीत सुरुवातीपासून सक्रिय असल्यामुळे घरात आंबेडकरी विचारांची पेरणी झाली. त्या विचारांनीच मला जिद्द दिली आणि यश मिळवण्याची प्रेरणा दिली.”


अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या मोनालीच्या या यशाने ‘स्वप्न पाहण्याची हिंमत असेल, तर ती पूर्ण करण्याची ताकदही निर्माण होते’, हा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. 

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने