मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी आगरी सेनेचा इशारा : पुलावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

आगरी सेनेचा इशारा : पुलावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

 पालघर : मो. जलसार, ता. जि. पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील धोकादायक मोरी/पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक आता स्थानिकांच्या जीवाशी थेट खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाने पूर्वीच बंदीचे आदेश दिले असतानाही ५० ते ६० टन वजनाची अवजड वाहने दिवसाढवळ्या या पुलावरून धावत असल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या गंभीर प्रकाराविरोधात आगरी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष चेतन गावड . पालकमंत्री  गणेश नाईक यांना निवेदन देत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. आगरी सेना प्रमुख श्री. राजाराम साळवी आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. कैलास हरी पाटील यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत.


विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. १२ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना मनाई असल्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले होते. मात्र, हे आदेश कागदापुरतेच मर्यादित राहिले असून प्रत्यक्षात ट्रेलर, काँक्रीट मिक्सर आणि इतर अवजड वाहने पुलावरून बिनधास्त सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.


स्थानिकांच्या मते, प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.


हा पूल परिसरातील ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. आगामी पावसाळ्यात जर हा पूल कोसळला, तर संपूर्ण गावाचा संपर्क तुटून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागू शकतात. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप अधिक वाढत आहे.


आगरी सेनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत खालील मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे :

पुलावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी

वजन मर्यादेचे कठोर पालन करावे

स्पष्ट सूचना फलक व बंदी आदेश लावावेत

पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती करावी



“दुर्घटना घडल्यानंतर जागे होणाऱ्या प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने