पालघर, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे “वन कायदे व पर्यावरण” या विषयावरील बहुपर्यायी लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा, पर्यावरण जनजागृती व्याख्यान व विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाबाबत युवक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, वन कायद्यांविषयी माहिती देणे तसेच वाढत्या पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर सुशील गंगाधर नांदवटे यांनी प्रस्ताविकातून पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून प्रत्येकाच्या अस्तित्वाशी निगडित घटक असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत असून भविष्यात किनारपट्टीवरील शहरांना धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास, हवामान बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड, जलस्रोतांचे नुकसान तसेच जैवविविधतेवरील संकट याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. भारतीय संविधानातील कलम ५१(अ)(ग) नुसार पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले
.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पर्यावरण मित्र प्रा. सुधीर भांडवलकर यांनी हवामान बदल व पर्यावरण संकटावर सखोल मार्गदर्शन केले. “या पर्यावरण दिनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. पर्यावरण वाचविणे म्हणजे मानवजातीचे भविष्य वाचविणे होय,” असे आवाहन त्यांनी केले. संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाचा संदर्भ देत वृक्ष संवर्धनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरणपूरक धोरणांचाही त्यांनी उल्लेख केला.
यानंतर “वन कायदे व पर्यावरण” विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित वन कायदे, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता आणि हवामान बदल याविषयीचे ज्ञान प्रदर्शित केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोरे कुरण येथील संरक्षित वन क्षेत्रात सुमारे ६ हजार बीज गोळ्यांचे (Seed Balls) प्रक्षेपण करून वृक्ष लागवड उपक्रमही राबविण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सुमारे १ लाख बीज गोळ्यांची निर्मिती करण्यात आली असून लोकसहभागातून विविध वनक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास डहाणू वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, सहाय्यक वनसंरक्षक रामानुजी बांगर, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे अध्यक्ष, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, सर्प इंडिया संस्थेचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
“पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हरित पालघर आणि हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील गंगाधर नांदवटे यांनी केले.
