पालघर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मान्यताप्राप्त शिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता राखली जावी या उद्देशाने पंचायत समिती पालघरच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती पालघर कार्यक्षेत्रात शासनाची मान्यता अथवा आवश्यक परवानग्या न घेता कोणतीही शाळा कार्यरत असल्यास त्याबाबतची माहिती नागरिकांनी प्रशासनास कळवावी, असे आवाहन करण्यात आले
आहे.
शिक्षण विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच त्यांच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा शाळांची माहिती वेळेत प्रशासनापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नागरिक, पालक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी संबंधित शाळेचे नाव, पत्ता, चालविणाऱ्या संस्थेचे नाव व उपलब्ध इतर माहिती शिक्षण विभाग, पंचायत समिती पालघर यांच्याकडे लेखी स्वरूपात किंवा दूरध्वनी / व्हॉट्सअॅपद्वारे 9130117311, 9224463984, 9869851594 या क्रमांकांवर अथवा beo palghar@gmail.com या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व विद्यार्थीहिताचे बनविण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती पालघर यांनी केले आहे.
