जिल्हा परिषद पालघर
दिनांक : १ जुलै २०२६
सुरुवात*
पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देत प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत जिल्हा परिषद पालघर येथे आज (१ जुलै) कृषी दिनाचे औचित्य साधून ‘एक कर्मचारी – एक वृक्ष’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, १ जुलै (कृषी दिन) ते १ ऑगस्ट (पालघर जिल्हा वर्धापन दिन) या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी किमान एक स्थानिक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
आज जिल्हा परिषद परिसरात झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, महिला व बाल विकास अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ‘सीडबॉल’ उपक्रमातून तब्बल २४ लाख ६२ हजार ५०९ सीडबॉल तयार करून पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिल्यानंतर ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेचे शिक्षक दीपक देसले यांनी मांडली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी त्यावर सकारात्मक विचार करून जिल्हाभर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
या अभियानांतर्गत प्रत्येक कर्मचारी आपल्या नावाने केसर आंबा, बाहडोली जांभूळ, बहावा, गुलमोहर,कडुलिंब, करंज, वड, पिंपळ, सिताफळ किंवा उंबर यांसारख्या स्थानिक जैवविविधतेला पोषक वृक्षप्रजातींपैकी किमान एक वृक्ष लावणार असून त्याचे संरक्षण, संवर्धन व नियमित संगोपन करणार आहे. वृक्षारोपणाची नोंद ‘अमृतवृक्ष’ ॲपवर जिओ-टॅगसह छायाचित्रांसह अपलोड करण्यात येणार असल्याने प्रत्येक वृक्षाच्या वाढीवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आ
हे.
उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्षअखेरीस मूल्यांकन करण्यात येणार असून, सर्वाधिक वृक्षांचे यशस्वी संवर्धन करणाऱ्या विभागाला सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
‘एक कर्मचारी – एक वृक्ष; हरित पालघर, समृद्ध पालघर’ या संकल्पनेतून प्रत्येक कर्मचाऱ्याने एका वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट व्हावी आणि लोकसहभागातून पालघर जिल्हा अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक व शाश्वत बनावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले.
