अकोला प्रतिनिधी
अकोला महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये वंचित बहुजन आघाडीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक नीलेश देव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह संतोष रहाटे, भिरड आणि ज्ञानेश्वर सुलताने यांच्या उपस्थितीत पाचही नवनिर्वाचित नगरसेवकांची ही बैठक झाली.
या बैठकीत महापालिकेतील आगामी धोरण, प्रशासनाची भूमिका आणि विशेषतः नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर पक्ष कशा प्रकारे आक्रमक भूमिका घेईल, यावर सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नीलेश देव यांच्याकडे आता पक्षाची जबाबदारी अधिक वाढली असून, महापालिकेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी महापालिकेत जनहिताच्या मुद्द्यांवर कितपत प्रभावी ठरते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
या बैठकीला नगरसेवक पराग गवई, जयश्री बहादूरकर, उज्वला पातोडे तसेच शेख शमसू कमर आणि शेख साबीर यांची उपस्थिती होती. एकूणच, वंचित बहुजन आघाडीने संघटनात्मक बळकटी करत महापालिकेत सक्रिय आणि ठोस विरोधी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
