प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधत समाजसेवा, संविधानिक मूल्यांची जोपासना आणि कायदेविषयक जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणारे ॲड. राहुल दिनेश ठाकरे यांना ‘संविधान सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान हरी नारायण सेवा संस्थान यांच्या वतीने देण्यात आला. भारतीय संविधानाच्या आदर्श मूल्यांची अंमलबजावणी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले योगदान तसेच सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका याची दखल घेत संस्थानने हा पुरस्कार प्रदान केला.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, ॲड. राहुल ठाकरे यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून संविधानाच्या मूलतत्त्वांना बळकटी देणारे आहे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुरस्कार स्वीकारताना ॲड. राहुल ठाकरे यांनी संविधानाची मूल्ये जपणे ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्य असल्याचे नमूद करत, भविष्यातही न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार संविधानाप्रती निष्ठा जपणाऱ्या कार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे.

