महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव स्वराज सुनीता किसन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली आहे. या यशामुळे चव्हाण कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वराज चव्हाण हे सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर नगर परिषदेत कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सातत्याने सुरू ठेवली आणि आपल्या मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
दरम्यान, प्रा. किसन चव्हाण यांचे दुसरे चिरंजीव सिद्धार्थ चव्हाण हे भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. दोन्ही मुलांनी मिळवलेल्या यशामुळे चव्हाण कुटुंबाचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांच्या कर्तृत्वाचा सर्व स्तरांतून गौरव केला जात आहे.
स्वराज चव्हाण यांच्या PSI पदावरील निवडीबद्दल तसेच सिद्धार्थ चव्हाण यांच्या कार्याबद्दल विविध मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
