पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संतोष कृष्णा पावडे सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर ते निवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणारे पावडे सर हे पालघर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अध्यापन पद्धती, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे.
रविवार, ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळेत नवली, पालघर येथील सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) ज्ञातीहितवर्धक मंडळाचे कै. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह येथे हा सेवापूर्ती सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
पावडे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमानिमित्त पावडे सरांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात येणार असून, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
