डहाणू : डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पालघर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे सुमारे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
२० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास डहाणूतील इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये काळ्या रंगाचे मास्क व जॅकेट घातलेले तीन अनोळखी व्यक्ती घुसले. त्यांनी सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. दुकानमालक विनय कैलास सोनी यांनी प्रतिकार केला असता एका आरोपीने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी दुकानातील काचा फोडून सुमारे ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने व इमिटेशन ज्वेलरी लुटून नेली होती.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यशवंत सदू चौधरी (४०), दिपेश यशवंत गवळी (२२) आणि विशाल धाक्या चौरे (२३) यांना अटक केली.
पालघर स्थानिक गुन्हे शाखा, डहाणू पोलीस आणि सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामुळे दरोडा प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुर शेलार करीत आहेत.
