पालघर : पालघर जिल्ह्यातील कंत्राटी व मानधनावरील शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्यासह पवित्र पोर्टलवर OBC आरक्षण शून्य टक्के दाखविल्याच्या निषेधार्थ बाधित शिक्षक उमेदवार आणि OBC कार्यकर्त्यांनी आज पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.
सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांना पालघर पूर्व येथील शासकीय विश्रामगृहात आंदोलन करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन शासकीय विश्रामगृह परिसरात सुरू ठेवण्यात आले.
दुपारी सुमारे १.३० वाजता आमदार राजेंद्र गावित आंदोलकांच्या भेटीस आले. यावेळी कंत्राटी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आंदोलकांनी मागणी केली की, स्थानिक आदिवासी शिक्षकांना ज्या पद्धतीने TET 2022 ची पात्रता ग्राह्य धरून सरळ सेवेत सामावून घेण्यात आले, त्याच धर्तीवर बिगर आदिवासी स्थानिक कंत्राटी व मानधनावरील शिक्षकांनाही सेवेत सामावून घ्यावे. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या शिक्षकांसाठी २०१७ व २०२२ मधील पात्रता ग्राह्य धरून भरतीची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पवित्र पोर्टल रद्द करून त्यामध्ये स्थानिक OBC उमेदवारांसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्याद्वारे भरती प्रक्रिया राबवावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच बाहेरील जिल्ह्यात नोकरीसाठी जाण्याऐवजी पालघर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळावी, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.
यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी शिक्षण मंत्री आणि मुख्य सचिव यांच्यासोबत आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न आणि OBC आरक्षणाचा मुद्दा आता पालघर जिल्ह्यात पुन्हा ऐरणीवर आला असून, शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे शिक्षक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
