मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खंड नाही; सेस फंडातून पालघर जिल्हा परिषदेची तातडीची मदत

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खंड नाही; सेस फंडातून पालघर जिल्हा परिषदेची तातडीची मदत


 जिल्हा परिषद पालघर

दिनांक १४.०८.२०२६


*

२ लाख २२ हजार ३०९ विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरळीत; धान्यपुरवठ्यातील अडचणीवर तात्पुरता तोडगा


शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू झाल्यानंतर शालेय पोषण आहारासाठी तांदूळ व धान्यादी मालाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खंड पडू नये, यासाठी पालघर जिल्हा परिषदेने तातडीने उपाययोजना केली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तात्पुरता धान्यसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार मिळत आहे.


शाळा सुरू झाल्यानंतर धान्यपुरवठ्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेतला. तालुकास्तरावरून धान्यपुरवठ्याबाबत निवेदने प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोणताही खंड पडू नये, यासाठी सेस फंडातून तात्पुरता धान्यसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.




प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ३७५ शाळांमधील २ लाख २२ हजार ३०९ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे १ लाख ३८ हजार ६७५, तर सहावी ते आठवीचे ८३ हजार ६३४ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे, त्यांची गळती रोखणे तसेच अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.


त्यानुसार वाडा, जव्हार आणि मोखाडा पंचायत समित्यांच्या अंतर्गत शाळांना तातडीने तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरळीतपणे देणे शक्य झाले.



दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन करारनामा करण्यात आला असून नियमित धान्यपुरवठ्यासाठी पुरवठादारास आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरळीत सुरू राहण्यास मदत झाली असून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कुठलाही अडथळा येणार नाही असे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर ने स्पष्ट केले आहे.


जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने